Devendra Fadnavis' response to Rahul Gandhi on doubts over Maharashtra election results
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि महत्त्वपूर्ण मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अजूनही महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे व खासदार संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदारांची संख्येवरुन संशय व्यक्त केला आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार औद्योगिक महोत्सवा’चे उदघाटन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राहुल गांधी यांच्या आरोपावर सडकून टीका केली आहे. तसेच खास सोशल मीडिया पोस्ट करुन टोला देखील लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “दिल्लीमध्ये कॉंग्रेसचा पराभव दिसू लागल्यामुळे राहुल गांधींचं हे कव्हर फायरिंग सुरु आहे. राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावं. किती मतदार वाढले आणि कुठे अन् कसे वाढले हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आता ही जी तयारी सुरु आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड पराभव होणार असल्यामुळे आहे. मी वारंवार सांगतो आहे त्यांनी आत्मचिंतन करावं. त्यांनी मनाची खोटी समजूत काढत राहतील तोपर्यंत जनतेचे समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीस यांनी शिवशस्त्रशौर्यगाथा हा कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले. यामध्ये प्रतापगडावरील शौर्यावेळी लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. याबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्यावेळी त्यांनी वापरलेली वाघनखं हा स्वराज्याचा एक ठेवा आहे. तो व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नामुळे देशामध्ये आला. गेले काही महिने साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये तो होता. आता विदर्भाच्या जनतेला त्याचं दर्शन घेता यावं म्हणून नागपूरच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते राहुल गांधी?
दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘पाच वर्षात म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या काळात 32 लाख नवे मतदार मतदार यादीत जोडले गेले. तथापि फक्त पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक 2024 या काळात 39 लाख मतदार मतदार यादीत जोडले गेले. मग प्रश्न आहे, की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीनंतर 39 लाख मतदार यादीत जोडले गेले आहेत. हे 39 लाख मतदार कोणते आहेत.एकट्या हिमाचल प्रदेशचे जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार महाराष्ट्राच्या यादीत या पाच महिन्यात कसे जोडले गेले. असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच, केवळ पाच महिन्यात 39 लाख मतदार कसे आणि कुठून जोडले गेले याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025