
'आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला...'; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल
कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटावर पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह चोरल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाने आता कल्याण-डोंबिवली मनपातील 4 नगरसेवक त्यांचे मोबाईल बंद करून बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे. नगरसेवक त्यांच्या घरी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवित आणि संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याने त्यांचा तात्काळ शोध सुरू करावा, असे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मतमोजणीनंतर काही वेळात ठाकरे गटाचे कल्याणमधील अॅड. कीर्ति ढोणे, मधुर म्हात्रे हे नगरसेवक त्यांचे संपर्क क्रमांक बंद करून ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कापासून दूर झाले. त्यानंतर स्वप्नाली केणे, राहुल कोट हे नगरसेवक आमच्यापासून दूर झाले. अशाप्रकारे आमचे ४ नगरसेवक सत्ताधाऱ्यांनी पळविले असल्याचा संशय शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावू असे म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आता यामध्ये काही नवीन राहिले नाही. त्यांचे आम्ही आता पोस्टर लावणार आहे. यांना कोणी पाहिले आहे का? असे पोस्टर लावू. संपूर्ण कल्याण डोंबिवलीत, महापालिकेच्या सभागृहात, भाजपच्या कार्यालयात, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात लावू. त्याशिवाय मिसिंग पर्सन म्हणून क्राईमचा जो रेकॉर्ड आहे. त्यामध्ये त्या चौघांची नावे येतील, असे यावेळी राऊतांनी म्हटले.
सोलापुरात झेडपीत दोन्ही शिवसेना एकत्र
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.