hindi compulsory in school GR Holi by shivsena Uddhav Thackeray
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये मराठी सक्ती असली तरी हिंदी भाषा देखील पर्यायी तिसरी भाषा म्हणून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणामध्ये त्रिसूत्री स्वीकारल्यामुळे मराठी व इंग्रजीनंतर तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदी ठेवण्यात आली आहे. मात्र चिमुकल्या मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याविरोधात मनसे व ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याविरोधात राजकीय होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी महायुती सरकारकडून शालेय अभ्यासक्रम जाहीर करताना पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. याविरोधात मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर आता अनिवार्य शब्द काढून पर्यायी भारतीय भाषा म्हणून राज्य सरकारने हिंदी भाषेचा पर्याय दिला आहे. कोणतीही तिसरी भारतीय भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. यामध्ये 20 विद्यार्थी असतील तर शिक्षक देखील देण्यात येणार असल्याचे देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. मात्र वेगळ्या मार्गाने का होईना राज्यात हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर सभा आणि होळीची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज (दि.29) आझाद मैदानाजवळ मुंबई मराठी पत्रकार संघ परिसरात ही होळी केली जाणार आहे. यावेळी हिंदी भाषेच्या निर्णयाच्या शासन आदेशाची होळी केली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे. मराठी मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे मनसेचे नेते व कार्यकर्ते देखील या होळीला उपस्थित राहणार आहेत. या राजकीय होळीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थिती राहणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर दादर येथील प्रबोधनकार ठाकरे चौक तसेच वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. अनिल देसाई, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेठीगाठी वाढल्या आहेत. गुरुवारी मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झाल्यानंतर शनिवारी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आणि माजी मंत्री अनिल परब यांची भेट झाली. या भेटीतही ५ जुलैच्या मोर्चाची नियोजनाबाबत चर्चा झाली.