चर्चा तर होणार...! मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो; मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापणार
मुंबई : सध्या राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. त्यात अनेक राजकीय पक्षांनी उडी घेतल्याचेही दिसून आले आहे. त्यातच आता मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको. तर पाचवीपासून हिंदी शिकवावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा हवाला देत मनसेने बॅनरद्वारे सरकारवर टीका केली आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी लावलेल्या या बॅनरवरून उपमुख्यमंत्र्यांचा मराठी भाषेविरोधी दृष्टिकोन अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे.
दरम्यान, या बॅनरमधून ‘उपमुख्यमंत्री मराठी सक्ती नको म्हणतात, पण सरकार ऐकत नाही,’ असा संदेश देण्यात आला आहे. दादर परिसरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू असून, मराठी भाषेच्या मुद्द्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज जाहीरसभा
तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीच्या वतीने २९ जून रोजी दुपारी ३ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समितीने विशेष निमंत्रण पाठवले आहे.
सक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव
शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात समन्वय समिती स्थापन झाली आहे. २९ जूनच्या जाहीर सभेत सरकारच्या अन्याय्य शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली जाईल. पत्रात शिंदे यांना सभेला उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती करण्यात आली असून, त्यांच्या पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. ही सभा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यातून सरकारवर तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.