
Sahil Wakode parents
Sahil Wakode Suicide Case : IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. साहिलच्या पालकांनी मुलाच्या मृत्यूची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
साहिलचे आई-वडील रवींद्र वाकोडे व सोनाली वाकोडे यांनी वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. २० वर्षीय साहिल हा IIT मुंबईमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. १८ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला होता.
साहिलने जातीय भेदभाव आणि अपमानाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी याचिकेत केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अपेक्षित गांभीर्याने तपास होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
याचिकेनुसार, साहिलला काही प्राध्यापक आणि परीक्षेच्या वेळी उपस्थित असलेल्या पर्यवेक्षकाकडून जातीय स्वरूपाच्या टिप्पण्यांना सामोरं जावं लागलं होतं. प्राध्यापक सूर्यानारायण दुल्ला यांच्यावरही साहिलबाबत जातीय टिप्पणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या परीक्षेच्या वेळी ते पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते, असं याचिकेत म्हटलं आहे.
याचिकेत आणखी एक महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. IIT मध्ये खोली मिळाल्यानंतर साहिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावायचे होते. मात्र, त्याच्या रूममेट्सनी असे केल्यास जातीय भेदभावाचा सामना करावा लागू शकतो, असा सल्ला दिल्याचं पालकांनी म्हटलं आहे.
साहिलने ही बाब घरी सांगितल्यानंतर पालकांनीही कोणताही वाद होऊ नये म्हणून फोटो लावू नको, असा सल्ला दिल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणातील सर्व CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश IIT प्रशासनाला द्यावेत, अशी मागणीही पालकांनी केली आहे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर किंवा प्राध्यापकांवर कोणताही दबाव आणला जाऊ नये, याची खबरदारी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
पवई पोलिसांनी यापूर्वी पालकांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणीही याचिकेत आहे. आता हायकोर्ट या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: साहिल वाकोडे हा IIT मुंबईमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा २० वर्षीय विद्यार्थी होता. १८ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
Ans: साहिलच्या मृत्यूची CBI किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
Ans: साहिलला काही प्राध्यापक आणि परीक्षा पर्यवेक्षकाकडून जातीय स्वरूपाच्या टिप्पण्यांना सामोरं जावं लागल्याचा आरोप पालकांनी केला आहे.