'गोपीचंद पडळकरांना सत्तेचा माज'; जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आक्षेपार्ह विधानावरून चर्चेत असतानाच आता त्यांच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. गोपीचंद पडळकर यांना सत्तेचा माज असल्याचे आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. पडळकरांना सत्तेचा माज चढला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केला. बुधवारी विधिमंडळाच्या आवारात जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आव्हाड यांनी सांगितले की, ‘पडळकर यांनी कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार,’ असे बेदरकार वक्तव्य केले. हा सत्तेचा माज असल्याची टीका आव्हाड यांनी केली.
पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना लागल्याने हा वाद पेटला. यानंतर पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात शिवीगाळ केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ‘तुम्ही अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही काय करणार? बंदुका घेऊन या, जीव घ्या आमचा,’ असे आव्हानात्मक वक्तव्य आव्हाड यांनी केले.
वादाचे नेमकं कारण काय?
यापूर्वीही आव्हाड यांनी विधानभवन परिसरात ‘मंगळसूत्र चोर’ अशा घोषणा देत पडळकर यांच्यावर टीका केली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी आव्हाड यांना ‘अर्बन नक्षले’ आणि ‘मुसलमानांचा एक्स’ असे संबोधले होते. आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते वैयक्तिक टीका करत नाहीत, पण पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले.
मी एकटा फिरतो, माझ्या अंगावर गाडी घाला
‘मी एकटा फिरतो, गाडी घाला माझ्यावर,’ असेही आव्हाड म्हणाले. पडळकर यांच्याकडून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने खालच्या पातळीवर टीका केली जाते. ज्यामुळे यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा असे विधान केले आहे.