
late leader Gopinath Munde political heir Controversy on Pankaja Munde or Dhananjay Munde
Gopinath Munde heir: बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा हक्कावरुन पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये यावरुन पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या आमदार धनंजय मुंडे आणि कन्या असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यामधील खरे वारसदार कोण यावर नेत्यांमध्ये जुंपली आहे. पूर्वीपासून पंकजा मुंडे या भाजपमध्ये राहिल्या आहेत. तर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत मुंडे कुटुंबाला धक्का दिला आहे. आता अजित पवारांसोबत असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजपसोबत महायुतीमध्ये चुल मांडली आहे. यामुळे पंकजा आणि धनंजय मुंडे हे आता सत्ताधारी महायुतीमध्ये आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुंडेंचा वारसदार या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ओबीसी समाजाला संबोधित करताना मुंडे कुटुंबाचा उल्लेख केला. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावरुन या वारसदार वादाला तोंड फुटले. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले प्रकाश महाजन?
प्रकाश महाजन यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन धनंजय मुंडेंवर आणि अप्रत्यक्षपणे करुणा मुंडेंवर टीका केली. प्रकाश महाजन म्हणाले की, क्या जमाना आ गया स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे ….एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला. दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो फक्त आणि फक्त माझी पंकू ताई दुसरे कोणी नाई, अशी सोशल मीडिया पोस्ट प्रकाश महाजन यांनी केली आहे.
त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, वैचारिक मतभेद असू नयेत. देशात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरवून गेला. मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंची बाजू सावरली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली आहे. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खऱ्या वारसाला कळत नाही का? खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण? नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.