संग्रहित फोटो
जालना : गेेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गेल्या काही दिवसाखाली सरकारने मदत जाहीर केली असली तरीही ती मदत काही शेतकऱ्यापर्यंत पोहचली नाही. अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. पाटलांनी मदत नाही मिळाली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, आज भाऊबीजेच्या दिवशी आम्ही यादी तयार करतोय. लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार आहे. अनेक ठिकाणी सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही मदत म्हणता येणार नाही. तो तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस हे प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला. शेतकऱ्याचे काम करणारे अभ्यासक, तज्ञ, नेते एकत्र बसू. सगळ्यांना फोन करून बोलावणार आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
आमच्याकडे एकच इमानदारीने लढण्याची आणि ती जिंकण्याची गोष्ट आहे. सर्व संघटनेचे, पक्षाचे शेतकरी नेते आम्ही अंतरवालीत बोलावणार. पहिला टप्पा एकत्र बसून चर्चा करु. नंतर सर्वांची बैठक आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार. आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत. तरी त्यांना पाच कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला लाडक्या दाजीला सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा होणार नाही हे देश सुद्धा पाहिल. हमीभाव कसा होत नाही, कर्जमुक्ती कशी भेटत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कशा नोकऱ्या देत नाहीत तेही बघू. शेतकऱ्यांना आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. सोनं, चांदी सगळं वाढलं, त्यांचं पाणीही वाढलं मात्र आमच्या दुधाला भाव मिळाला नाही, असेही जरांगे म्हणाले.
झेंडूला 10 रुपये किलो देखील भाव नाही
पंढरपूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या झेंडूच्या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे संतप्त होऊन ती फुलं थेट रस्त्यावर फेकून दिले आहेत. राज्यात दिवाळीचा सण साजरा होत असताना पंढरपूर तालुक्यात काही शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याने दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून झेंडूची फुलं बाजारात विक्रीसाठी आणली होती. मात्र, बाजारात १० रुपये किलो देखील भाव मिळत नसल्याने त्यांना संताप अनावर झाला. वाहतूक, तोडणी आणि मजुरीचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्याने रस्त्यावरच फुलं फेकून आपला निषेध नोंदवला.