
Maharashtra Politics: खेडमध्ये महायुतीत ठिणगी तर 'या' नगरपंचायतीमध्ये...
देवरूख नगरपंचायतसाठी महायुतीकडून वज्रमूठ
आज शक्तिप्रदर्शन करीत करणार अर्ज दाखल
महायुतीचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित
देवरुख: नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांची भक्कम अशी एकजूट तयार झाली असून महायुतीच्या माध्यमातून शुक्रवारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये तसेच महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जोरदार असे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीकडून करण्यात आली असून महायुतीचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षात तयारी करण्यात आली आहे. परंतु या निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी होणार की नाही? या प्रतीक्षेत मित्र पक्ष व त्यांचे इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर झाला होता.
पालकमंत्री उदय सामंत दर्शवणार उपस्थिती
त्यानंतर नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतील. यावेळी पालकमंत्री उदय सामत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, भाजपा नेते प्रशांत यादव, माजी आमदार विनय नातू, निवडणूक संयोजक प्रमोद अधटराव, यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ
निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार…
मात्र आता देवरुख नगरपंचायत निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा ठाम निर्णय घटक पक्षांनी घेऊन महायुतीवर शिक्कामोर्तब केले आहे. महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून भाजपच्या मृणाल शेट्ये यांच्या नावावर एकमत झाले आहे. तर नगरसेवक पदासाठी जगावाटप फार्म्युला देखील निश्चित करण्यात आला आहे. कोणतीही रस्सीखेच न करता झालेले जागावाटप देवरुख मधील महायुतीची भक्कम एकजूट दाखवणारे ठरले आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून ही एकजूट कायम ठेवून शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणालताई शेट्ये यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोळजाईचे आशीर्वाद घेऊन होणार रवाना
शुक्रवारी सकाळी १० वाजता देवरुखचे ग्रामदैवत सोळजाई देवीचे आशीर्वाद घेऊन उमेदवार व कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होतील. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून जोरदार असे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. माणिकचौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे मातृमंदिर चौक मार्गे नगरपंचायत येथे सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.