Mangaon : लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख
माणगाव /सुनिल राजभर : महायुती सरकार मार्फत संपुर्ण राज्यात महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. महिला व बाल विकास खात्या तर्फे राबविण्यात आलेल्या “माझी लाडकी बहीण” योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी व मार्च महिन्याचे “माझी लाडकी बहीण” योजनेचा हफ्ता दि.7 ते 12 मार्च दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार महिला सक्षमीकरणावर अधिकाधिक भर देत असून महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन आदिती तटकरे यांनी माणगावात पार पडलेल्या विविध विकासकांच्या लोकार्पण व शुभारंभ प्रसंगी केले.
दि. 9 मार्च रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगाव पंचायत समिती येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माणगाव कार्यालयाच्या नवीन इमारतीची भूमिपूजन पार पडले. तसंच ढालघर फाटा ते वावे रोहिदासवाडी रस्त्याचे लोकार्पण, लोणशी मोहल्ला ईदगाह मैदान संरक्षक भिंत कामाचे उद्घाटन व लोणशी मोहल्ला, लोणशी बौद्धवाडी येथे सिमेंट बंधारा कामाचे भूमिपूजन ना तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, तहसीलदार दशरथ काळे, तालुकाध्यक्ष काका नवगणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, होडगाव सरपंच बळीराम खाडे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, हुसेन रहाटविलकर, लोणशी उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के, भाई दसवते प्रशासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तटकरे पुढे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाला आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण सामग्री पुरविल्या जातील. उन्हाळ्याच्या वेळेत तालुक्यात पाणीटंचाई भासत असते. ह्या टंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील बहुतांश गावात योजना राबविल्या आहेत. यापुढेही जल जीवन मिशन टप्पा दोन अंतर्गत योजना राबवल्या जातील. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ तालुक्यात येणार नाही अशा प्रकारच्या पाण्याच्या योजना राबविल्या जातील. त्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल. व त्याची पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी राहील. ग्रामपंचायत लोणशी हद्दीत विविध विकास कामे करण्यात आली आहेत.
निवडणुकीच्या काळात येथील जनतेने तटकरे कुटुंबांना भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे येथील विकास कामे ही जलद गतीने करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात उर्वरित सर्व विकासकामे मार्गी लावली जातील असा विश्वास देखील यावेळी अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.