
काँग्रेसची गळती थांबता थांबेना !
हिंगोली : हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी माजी खासदार दिवंगत राजीव सातव हे नाव उच्चारलं की विरोधकांचासुद्धा मान झुकायचा. गोड वाणी, सुसंघटित संगठन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व या जोरावर भाऊंनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनवला. पण कोविडने सातव यांना हिरावून नेलं आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली.
राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून पक्षाने प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली. परंतु अपेक्षित नेतृत्व, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांशी नाळ या तिन्ही बाबतीत त्यांना भक्कम पकड मिळवता आली नाही. पक्षात कार्यकर्ते, नेते दुरावले. मतभेदातून काँग्रेसमध्ये ‘आउटगोइंग’चा महापूर सुरू झाला. अजूनही तो कायम आहे.
काँग्रेसमध्ये असताना राजीव सातव यांच्या कोअर टीममधली माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी उपनगराध्यक्ष नेहाल भैया, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी पक्ष सोडला. तर अलिकडेच जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, औंढ्यातील सातव यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी तुकाराम देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बापूराव बांगर, अनिल नैनवाणी आदींनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीत हिंगोली ही कॉंग्रेसची परंपरागत जागा. तरीही ती राखता आली नाही हा पहिला धक्का. यानंतर खासदार नागेश पाटील यांनी प्रज्ञा सातव आघाडीचा धर्म पाळला नाही, अशी तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाला पाठवली. तरीही पक्षाने प्रज्ञा सातव यांना साथ दिली. पुढे विधानसभा जागाही हातची गेली. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला गळती लागली असून, ही गळती कधी थांबेल, यासाठी आमदार प्रज्ञा सातव काय पुढाकार घेतील याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणुका जाहीर होताच सुरु झाला पक्षप्रवेश
निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकारी-नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. त्यातच आता माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आणि त्यांच्या पत्नी तेजश्री वाजे यांनी शुक्रवारी (दि.१४) नाशिक येथे भाजप कार्यालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election: घड्याळ चिन्हावर लढणार वडगावची निवडणूक; राष्ट्रवादीने जाहीर केली प्राथमिक यादी