विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; 'या' नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी
नागपूर : विधानसभा निवडणुकीत फटका बसलेल्या काँग्रेसकडून राज्यात नव्याने तयारी केली जात आहे. यानुसार, प्रदेश काँग्रेस कमिटीत अनुभवी-तरूणांचा समावेश करण्यात आला. वैदर्भीयांची मोठी छाप या कार्यकारिणीत दिसत आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना यात सन्मान करण्यात आला. राजकीय व्यवहार व कार्यकारी समिती वगळता 58 जणांना यात स्थान देण्यात आले.
दिल्लीहून मंगळवारी रात्री उशीरा ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्यातील सर्व खासदारांना कार्यकारी समितीत सामावून घेण्यात आले. आतापर्यंतची 381 सदस्यांची ही सर्वात जम्बो कार्यकारिणी आहे. राजकीय व्यवहार व कार्यकारी समितीत ज्येष्ठांना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसची बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणी सर्वसमावेशक अशी आहे. यात नाना पटोलेंच्या कार्यकारिणीतील अनेकांचा समावेश आहे. परंतु, तरुणांना थेट सरचिटणीस बनवून त्यांना संधी देण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवले. ‘वाद होऊ नये, नाराजी वाढू नये’, यासाठी सर्वसमावेशक अशी ही कार्यकारिणी आहे. यात सर्वच गटांच्या समर्थकांना स्थान देण्यात आले.
हेदेखील वाचा : Manikrao Kokate junglee rummy : माणिकराव कोकाटे तब्बल 22 मिनिटे खेळत होते रम्मी; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
विदर्भाकडे सपकाळ यांनी झुकते माप दिल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ उपाध्यक्षकांमध्ये आमदार अभिजीत वंजारी, डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वजाहत मिर्झा, माजी मंत्री अनिस अहमद, गोपाल अग्रवाल, नाना गावंडे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, रणजीत कांबळे यांचा समावेश आहे. उपाध्यक्षांमध्ये माजी आमदार अशोक धवड, अॅड. आसिफ शौकत कुरैशी, किशोर कन्हेरे, संध्या सव्वालाखे, तक्षशिला वाघधरे, सुरेश भोयर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विशाल मुत्तेमवार आदींना घेण्यात आले.
नेत्यांच्या मुलांना दिली गेली पदोन्नती
सपकाळ यांनी त्यांच्या टीममध्ये तरुणांना मोठी पदोन्नती दिली आहे. यात त्यांना सरचिटणीससारखे महत्त्वाचे पद दिले आहे. युवक काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत, आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे, माजी जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी मंत्री दिवंगत सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे, प्रसन्ना तिडके, माजी मंत्री दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार, माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आदींना मोठी संधी दिली गेली.