
निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश; कराडमध्ये 'कमळ'ची घोडदौड वेगवान
कराड : कराड शहरानजीकच्या मोठ्या सैदापूरचे ग्रामपंचायतचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह चरेगाव, साबळवाडी, चितळवाडी आदी गावांतील सरपंच, सदस्य आणि मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत झाला. प्रवेशामुळे कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील सामाजिक बांधिलकी जपणारे नेते पक्षात दाखल होत आहेत. अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली विकासाची वाटचाल अधिक गती घेईल’, असे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘सैदापूर हे कराड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असून, फत्तेसिंह जाधव यांच्या प्रवेशाने संपूर्ण गाव भाजपच्या विचारसरणीशी जोडले गेले आहे. ग्रामपंचायत आणि सोसायटी पातळीवरही भाजपची ताकद वाढली असून, सैदापूरचे सर्व प्रश्न आम्ही प्राधान्याने मार्गी लावू,’ असे त्यांनी आश्वासन दिले.
हेदेखील वाचा : Bihar Elections : ‘बिहार निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल’; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, ‘सैदापूरसह चरेगाव, साबळवाडी, चितळवाडी आदी गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ पक्षात दाखल झाल्याने पाल आणि हैदापुर जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली असून, येथे भाजपचा एक हाती विजय होईल’. जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकेल. तसेच पुढील काळात आणखी मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा