पंढरपूरात राजकारण तापले
पंढरपूर / नवनाथ खिलारे : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रभागरचना अखेर निश्चित झाली असून, आता तालुक्यातील इच्छुकांना आरक्षणाचा वेध लागला आहे. प्रभाग नकाशा जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, पुढील काही महिन्यांत तालुका कोणत्या राजकीय समीकरणाकडे झुकतो, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर तालुक्यात एकूण आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गण असून, २०१७च्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची जोरदार सरशी झाली होती. जिल्हा परिषदेतील गट माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडे गेले होते. पंचायत समितीवरह परिचारक गटाने सत्ता स्थापन केली होती. तर विरोधी गटाला चार जागा मिळाल्या होत्या.
2020 मध्ये मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. मात्र या काळात तालुक्यातील राजकीय समीकरणात आमूलाग्र बदल झाले आहेत. प्रशांत परिचारक यांनी भाजपशी दुरावा निर्माण केला आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने भगीरथ भालके व अभिजित पाटील यांची राजकीय वाटचालही स्वतंत्र झाली आहे. अभिजित पाटील सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सक्रिय आहेत.
दुसरीकडे, भाजपने तालुक्यात नवी कार्यकारिणी जाहीर करून आपले संघटन पुन्हा मजबूत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. प्रशांत परिचारक यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. आरक्षणाचे अंतिम गणित जाहीर होताच तालुका पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगात न्हाल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठीची ही झुंज कोणत्या बाजूला झुकते, हे आगामी महिन्यांत स्पष्ट होणार असले तरी, पंढरपूर तालुका पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटावर केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत.
अभिजित पाटलांनी दाखवली ताकद
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांनी मोठा विजय मिळवत तालुक्यात स्वतःची ताकद दाखवून दिली. राज्य व केंद्रात सत्ता नसतानाही निधी खेचून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. मेंढापूरच्या माळराणावर प्रस्तावित एमआयडीसी सुरू करण्यासाठीही ते धडपड करत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली राजकीय छाप ठसवण्यासाठी आमदार अभिजित पाटील आक्रमक भूमिका घेतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
उमेदवारांच्या हालचालींना वेग
दरम्यान, भाजप आमदार व माजी आमदार गट एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. तर आमदार अभिजित पाटील गट कोणासोबत हातमिळवणी करणार का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले गट आगामी निवडणुकीसाठी नवी समीकरणे आखतात की जुन्याच चौकटीत झुंज देतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.