Manoj Jarange News:
पुणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढले असून भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीवेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “लाडकी बहीण-लाडकी बहीण आणि दीड-दीड हजार रुपये करुन नादी लावलं आहे. आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आल्या. तोपर्यंत प्रत्येक मंत्र्याच्या तोंडातून एकच शब्द निघतो आहे की, लाडक्या बहिणींना फसवणार नाही. लाडक्या बहिणींना मी हात जोडून सांगतो निवडणुका झाल्यावर हे पैसे देणार नाहीत. छोट्या छोट्या आशा धरू नका. लेकरा बाळांचे आयुष्याचे वाट होते, हे सगळं खोटं आहे. खोट्या प्रतिष्ठित जगणं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा,” असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे जवळपास चार महिने वेळ आहे. देवेंद्र फडणवीस बद्दल काही जणांची जी भावना आहे, ती उघडी पडणे गरजेचे आहे. लोकांना वाटतयं ते आरक्षणला वेळ द्यायला हवा. दोन वर्षे दिले होते, आता पुन्हा चार महिने दिलेत. देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांबद्दल किती द्वेष आहे, किती आकसाने ते मराठी गरीब बांधवांबरोबर वागतात. हे आता महाराष्ट्राला दिसेल. 29 ऑगस्ट ला मराठ्यांच्या मुलांना मुंबईमध्ये त्रास दिला जातोय का ? हे समाजाला कळेल. मराठा समाजाला रस्त्याने त्रास दिला जातोय का? मराठा समाजाबद्दल द्वेष आकस आहे का ? हे समाजाला कळेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. यामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका परिणामकारक ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत ते म्हणाले की, “महानगरपालिकेला कोणाला पाठिंबा द्यायचा हे आमचं ठरलं नाही, आमच्या डोक्यात राजकारण नाही. समीकरण जुळला नाही आम्ही मागे सरकलो. वेळ आली की, समाज ठरवतो कोणाला पाडायच त्याला बरोबर पाडतो. आम्ही मात्र कायदेशीर शांतपणे मुंबईत जाऊन बसणार,” अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी त्यांच्या मुंबईतील आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे.