
Nashik Politics : महापौरपदाचा उमेदवार दोन दिवसांत ठरण्याची शक्यता; गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल
नाशिक : राज्यातील काही महापालिकांच्या महापौरपदाची निवडणूक जाहीर झालेली असताना नाशिकच्या बाबतीत मात्र अनभिज्ञता असून, नगरसेवकांची गट नोंदणी झाल्याशिवाय महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू नये, अशा आयोगाच्या सूचना असल्यामुळे येत्या दोन दिवसात राजकीय पक्षांना गट नोंदणी केल्यावरच हा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्री गिरीष महाजन रविवारी (दि.२५) नाशकात दाखल होत असून, दोन दिवसांच्या मुक्कामात भाजपचा महापौरपदाचा उमेदवार जाहीर होण्याचा अंदाज आहे. महापालिकेची निवडणूक पार पडून नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचाही कार्यक्रम सुरू झाला आहे. अद्याप एकाही राजकीय पक्षाने विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. रविवार व सोमवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे मंगळवारी या संदर्भातील कार्यवाही सर्वच पक्षांकडून सुरू केली जाईल. भाजपने अगोदरच नगरसेवकांकडून प्रतिज्ञापत्रे भरून घेतली आहेत तर अन्य पक्षांकडूनही ही कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, गट नोंदणी झाल्याशिवाय महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. राज्यात ज्या ठिकाणी नगरसेवकांची गट नोंदणी झाली आहे, अशा काही मोजक्याच शहरांमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नाशिकच्या बाबतीत मात्र अनभिज्ञता
नाशिकच्या बाबतीत अनभिज्ञता आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत हा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून भाजपमध्ये इच्छुकांच्या जोरदार हालचाली सुरू होऊन लॉबिंग सुरू झाली आहे. महापौरपदाचा उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ठरवणार असल्यामुळे सध्या ते परदेशात आहेत.
नावे तीच, फिल्डिंग वेगळी
महापौरपदासाठी भाजपकडून सर्वसाधारण गटातील प्रामुख्याने हिमगौरी आडके, दिपाली गिते, स्वाती भामरे, दिपाली कुलकर्णी, योगीता आहेर अशा चार ते पाच महिला नगरसेवकांची नावे पुढे येत असली तरी, पक्षाकडून ऐनवेळी दुसरेच नाव पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे धक्के भाजपने अनेक वेळा दिले आहेत. त्यामुळे अन्य राखीव वर्गातील नगरसेवकही या पदासाठी इच्छुक असून, पक्षाकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.
गिरीश महाजन रविवारी होणार नाशकात दाखल
रविवारी मुंबईत परतल्यानंतरच या संदर्भातील निर्णय होईल. गिरीष महाजन रविवारी नाशकात दाखल होत आहेत. दोन दिवस ते नाशकात असून, त्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक होऊन महापौरपदाचा उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची तयारी सुरू आहे.