
आठ-आठ दिवस दौरे करण्याची वैभव नाईक यांना सवय नाही
राज्यभरात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते – उदय सामंत
राग न ठेवता विकासासाठी पाहिजे ती मदत केली – सामंत
रत्नागिरी: शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवणमध्ये हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर त्यांनी आपल्या सोबतच्या बॅगांमध्ये जे कपडे होते, त्यातून पैसे आणले होते, असा बालिश आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. वैभव नाईक यांच्या एका म्हणण्यात तथ्य होते. कारण ज्या बॅगा एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून आणल्या होत्या, त्यामध्ये त्यांचे कपडे होते आणि ते प्रचाराला बाहेर पडले की, ८-८ दिवस बाहेर असतात. त्यामुळे त्यांना बॅगांमधून कपडे आणावेच लागतात. असे ८-८ दिवसांचे दौरे करण्याची वैभव नाईक यांना सवय नाही. त्यामुळे ते केवळ दोन तासांसाठी येतात आणि पर्यटन करून जातात. त्यांच्याकडे बॅगा व त्यात कपडे असण्याची शक्यताच नाही. केवळ मोठ्या नेत्यावर टीका केली, आरोप केले की आपणही मोठे होतो, अशी वैभव नाईक यांची भूमिका असावी.
नाईकांना लगावला टोला
अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना शंभर टक्के मार्क देतील, अशी त्यांची अपेक्षा असावी. एकूणच नैराश्यातून वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत लगावला.
राज्यभरात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते…
मंत्री सामंत म्हणाले की, मंत्री सामंत म्हणाले, मी कालच प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणालो होतो की एकनाथ शिंदे हे राज्यात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते आहेत. हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो. मात्र हा आरोप करताना वैभव नाईक हे एक गोष्ट विसरले आहेत की, याआधी आपत्तीच्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री हे त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात आले होते व अनेकांना मदतीचा हातही दिला होता. एकनाथ शिंदे यांनी आपत्तीच्यावेळी जीव तोडून त्यांच्या मतदारसंघात मदतही केली होती, हे वैभव नाईकांनी विसरू नये. त्यामुळे नाईक यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची राजकीय अपरिपक्वताच दिसून आली आहे.
राग न ठेवता विकासासाठी पाहिजे ती मदत केली…
जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव नाईक यांना लगावला. राजकारण हे सर्वच करतात, परंतु आपण विरोधात असतानाही ज्यांची काम केली जातात, त्यांच्याबाबत कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणीव असायला हवी, ठेवायला हवी. एक मित्र म्हणून माझी त्यांना विनंती आहे, राजकारण हे होतच राहते. वैभव नाईक आमच्या पक्षात आले नाहीत, याचा कोणताही राग एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनात न ठेवता, त्यांना पाहिजे ती मदत विकासाच्या कामासाठी केलेली आहे. याची जाणीव ठेवून वैभव नाईक यांनी वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत, ते धादांत खोटे आहेत, असे सामंत म्हणाले.