
BJP MLA Narendra Mehta Scam: भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नरेंद्र मेहता यांच्यावर सरकारी भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टँप ड्युटी बुडवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे मेहता यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अशातच पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या एका आदेशानंतर मेहता अडचणीत आले असतानाच, आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक जुने पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात खुद्द बावनकुळे यांनी नरेंद्र मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ असा केल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे पत्र आता सार्वजनिक झाल्याने विरोधकांच्या हाती सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचे मोठे हत्यार मिळाले आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आदिवासी आणि इतर समाजाच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे. या जमिनी लाटताना मेहता यांनी तब्बल ४०० ते ५०० कोटींच्या स्टॅम्प ड्युटी देखील बुडवल्याचाही आरोप आहे. त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात मेहता यांचा थेट ‘भूमाफिया’ असा उल्लेख केला आहे. या पत्रात असलेल्या भूमाफिया या शब्दावरूनही काँग्रेस आमदार नाना पटोले आणि बावनकुळे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
या संदर्भातील एक पत्रच पटोले यांनी प्रसारमाध्यमांसमोर आणल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मेहता यांनी मोठ्या प्रमाणावर स्टँप ड्युटी (मुद्रांक शुल्क) बुडवल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केला.या पत्रावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत चौकशीची मागणी केली आहे.
महसूल खात्याने पाठवलेल्या या पत्रात म्हटले आहे की, “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेची, पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करणेबाबत” कारवाई करण्यात यावी. या पत्राद्वारे प्रशासनाला केवळ ७ दिवसांच्या आत या प्रकरणाची सखोल चौकशी करून, आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाना पटोले यांनी हा मुद्दा लावून धरत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “जेव्हा सरकारचे स्वतःचे मंत्री आपल्या आमदाराचा उल्लेख अधिकृत पत्रात ‘भूमाफिया’ म्हणून करतात, तेव्हा सत्य काय आहे हे स्पष्ट होते,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. मुद्रांक शुल्क बुडवून शासनाचा महसूल लाटल्याचा हा गंभीर प्रकार असून, आता ७ दिवसांच्या या मुदतीत नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रामुळे नरेंद्र मेहता यांच्या राजकीय अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.
शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत मेहता यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. बावनकुळे यांनी पटोलेंच्या आरोपांना ‘सडेतोड’ उत्तर दिल्याने या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे आता नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ होणार की सरकार त्यांना सावरून घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.