mns raj thackeray on Independence Day meat ban and Dadar kabutarkhana banned
Raj Thackeray Marathi News : मुंबई : स्वातंत्र्यदिनाची लगबग सुरु असताना देशभरामध्ये मोठा उत्साह दिसू येत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये नवीन वादाची ठिणगी पडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने मांसाहाराबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वाद वाढला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्ट रोजी मासे आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यावरुन आता वाद पेटला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये कबूतरखान्यावरुन देखील वादंग निर्माण झाला आहे. या सर्व मुद्द्यांवर मनसे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत..” एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही? असा आक्रमक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कशावर तरी बंदी आणणे हाच मोठा विरोधाभास आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन दिवशी तुम्ही बंदी कशी काय आणू शकता? कुणाचा काय धर्म, कुणाचे काय सण आहेत? यानुसार कुणी काय खावे, हे सरकारने सांगण्याची गरज नाही.” अशी स्पष्ट भूमिका मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी दादरमधील कबूतरखाना बंद करण्यात आल्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ती गोष्ट झाली पाहिजे. कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे,” असे मत मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.