mp sanjay raut aggresive over August 15 independence Day meat Banned in Maharashtra
Independence Day Meat Banned In Maharashtra : मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये नवा वाद उफाळून आला आहे. 15 ऑगस्ट रोजी मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला अनेकांनी जोरदार विरोध केला आहे. स्वातंत्र्यदिन हा कोणताही धार्मिक सण नसून हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्यदिनीच स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा निर्णय असल्याची टीका केली जात आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी इतिहासामधील दाखले देत मासांहार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. धार्मिक उत्सव नाही, शौर्याचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय मिळाला. ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालेलं नाही. या स्वातंत्र्यासाठी रक्तपात, हिंसाचार झाला. त्यात भाजप आत्ताची विचारसरणी आहे, मासं मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेही नव्हते” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “तुमच्याकडे मागणी केली कोणी स्वातंत्र्यदिनी? हे काय नवीन थोतांड आहे महाराष्ट्रात? तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन मावळे लढत होते का? ते मांसाहार करत होते. बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही, आता सीमेवरच्या सैन्याला सुद्धा मांसाहार करावा लागतो ना, श्रीखंड पुरी खाऊन नाही लढता येत. तुम्ही महाराष्ट्राला नामर्द करत आहात देवेंद्र फडणवीस, हे फतवे मागे घ्या,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, “स्वातंत्र्यदिनी मांसाहारा नाही, तुम्ही नका खाऊ. तुम्ही सगळे लपवून खात आहात. मग लोकांवरती ही बंदी का? – प्रत्येक प्रकारची बंदी हे आहे. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, महाराष्ट्र आहे की बंदी शाळा आहे? 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही. हा विजय उत्सव आहे, पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे. जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातील काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्ला आहे. 65 रेडे कापले त्या मंदिरात आणि त्या मंदिरात हा प्रसाद खावा लागतो. ही परंपरा आहे, तिथे बदकं कापली जातात इतर प्राणी कापले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून हे खावं लागतं,’ असा मोठा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.