MP Sanjay Raut demands culpable homicide after stampede at Mahakumbh Mela in Prayagraj
मुंबई : प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी महाकुंभ मेळा भरला आहे. मौनी अमावस्येसाठी कोट्यवधी भाविक जमल होते. मात्र महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी आहे. प्रयागराजमधील या दुर्घटनेवर उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. तर महाकुंभमेळ्याच्या दुर्घटनेवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “प्रयागराजला महाकुंभाचा सोहळा सुरू आहे. त्यात कोट्यवधी लोक कसे येत आहेत. त्या लोकांची आम्ही कशी व्यवस्था केली आहे, अशा प्रकारचं मार्केटिंग… राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत होतं. त्यात चुकीचं काही नाही. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही, असे राऊत म्हणाले. ज्यांची श्रद्धा आहे, ते लोक कुंभला जातात. कोट्यवधी लोक आल्याचे आकडे दाखवले जात आहे. सामान्य माणसांना 10 ते 15 किलोमीटर चालत जावं लागतय. तिथल्या व्यवस्थेवर जनता खूश नाही,” अशी नाराजी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “आज दुर्देवाने चेंगराचेंगरी झाली. माणसं तुडवली गेली. 10 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. शेकडो जखमी आहेत. स्वत: गृहमंत्री येऊन स्नान करून गेले. घाट बंद केला. त्यावेळी लोकांची अव्यवस्था झाली. संरक्षण मंत्री आल्यावरही अव्यवस्था झाली. जेव्हा जेव्हा व्हीआयपी येतात तेव्हा त्याचा हा परिणाम असतो. लोक बाहेर तुंबलेले असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो श्रद्धाळूंच्या सुरक्षेवर लक्ष देणं गरजेचं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
पुढे संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या दुर्घटनेवर पंतप्रधान लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहे. गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहे? त्याने प्राण वापस येणार आहेत का? लोक रस्त्यावर झोपले आहेत. अनेक महिला खुल्या रस्त्यावर झोपून आहे. 1954 रोजी जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पाहा. त्यावेळी नेहरूंनी स्वत: दौरा करून कुंभची पाहणी केली. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे पूर्णकाळ उपस्थित होते. त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता. धर्मशास्त्र म्हणून व्यवस्था केली. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वोत्तम होती असं लोक सांगतात. या व्यवस्थापनात इतर लोकांना सामावून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती, पण श्रेयवाद होता. आम्हीच हिंदुत्ववादी. आम्हीच करू शकतो. यासाठी हे सुरू होतं,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे संजय राऊत म्हणाले की, “10 हजार कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं. तिथे खर्च करण्यात आला. 10 हजार कोटी तिथे प्रत्यक्षात दिसत नाही. कोव्हिड काळात मुंबईत कोव्हिड सेंटर, खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मग कुंभमेळ्यातील 10 हजार कोटी कुठे खर्च झाले. कुठे गेले पैसे. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलालने जायला पाहिजे प्रयागराजला. १० हजार कोटी कुठे गेले? कोणत्या गंगेच्या प्रवाहात गेले? लोकं का मरण पावली असे प्रश्न या पोपटलालने विचारले पाहिजे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा, याचं उत्तर द्या ना,” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.