mp sanjay raut press detail information about vijayi sabha 2025 by raj and uddhav Thackeray
Vijayi Sabha 2025 : मुंबई : राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष जोरदार लढा दिला. तसेच येत्या 5 जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे मोर्चाची देखील घोषणा केली होती. मात्र यानंतर आता शासन आदेश रद्द करण्यात आल्यानंतर विजयी सभा घेण्यात येणार आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी अधिकची माहिती दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या जाहीर सभेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “माझी मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे दोघांसोबत चर्चा झाली आहे. यापूर्वी आम्ही शिवतिर्थावर सभा घेण्याचे ठरवले होते. यासाठी आम्ही पालिकेकडे विनंती अर्ज केला होता. मात्र पालिका हा अर्ज स्वीकारले असे वाटत नाही. यामुळे राज ठाकरे यांनी एनएससीआय डोमममध्ये मेळावा घेण्याचे सुचवले. याप्रमाणे आता आमचा विजयी मेळावा एनएससीआय डोमममध्ये होणार आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मनसे आणि शिवसेनेच्या या विजयी मेळाव्यासंदर्भात आमची एक बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये मेळाव्याचे स्वरुप ठरवण्यात आले. त्याप्रमाणे येत्या 5 जुलै रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील मोठ्या सभागृहामध्ये हा मेळावा आम्ही घेत आहोत. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित असतील. दोन्ही भाऊ एकत्र येतील याबाबत कोणच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. बैठकीमध्ये किती माणसं येतील, कोण येतील काय अन् कसं असावं याबाबत चर्चा केली असल्याचे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या विजयी मेळाव्याचे निमंत्रण देणार असल्याचे देखील सांगितले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार आहोत. त्याचं त्यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत. त्यांनी पहावा विजय दिवसाचा हा सोहळा काय आहे. मराठी भाषेसंदर्भात, हिंदी सक्तीसंदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, तो महाराष्ट्र द्वेष्टयांवरचा विजय आहे. म्हणून त्यांना जय महाराष्ट्र केला,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.