Sindhudurg News: शिवसेना नेते भरत गोगावले यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कोकणात भाजप आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सरचिटणीसांनी माफी मागा त्यानंतरच युतीवर चर्चा होईल, असा शिंदे गटाला इशारा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राजकारण चांगलचं तापलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात नारायण राणेंनी केसेस अंगावर घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या, प्रसंगी ते जेलमध्येही गेले, भानगडी केल्या, ते असेच मोठे झाले नाहीत. असं विधान केलं होतं. या मेळाव्यात मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित होते. पण गोगावलेंच्या या विधानाने वादाची ठिणगी पडली. वाद चिघळल्यानंतर गोगावलेंनी यूटर्न घेण्याचा प्रयत्नही केला. आपण नारायण राणेंबद्दल तसं विधान चुकून केल्याचं त्यांनी म्हटलं, आपल्या बोलण्याचा तसा उद्देश नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईच्या फेमस वडापावला द्या ट्विस्ट; घरी बनवा हटके आणि टेस्टी Tandoori Vada Pav
पण सिंधुदुर्गात मात्र राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. नारायण राणेंचे चिरंजीव आणि मंत्री नितेश राणेंनी गोगावलेंना तितक्याच सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. भरत गोगावलेंना आपण चहाचे आमंत्रण दिले आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तर भाजप नेते आणि मंत्र्यांकडून गोगावलेंच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर शिवसेना नेते मात्र सारवासारव करताना दिसत आहेत.
पण भरत गोगावलेंचा हा मुद्दा सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांचा चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सरचिटणीस महेश सारंग यांनी, भरत गोगावलेंनी जाहीर माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात युतीबाबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असा थेट इशाराही दिला आहे.
ज्या नारायण राणे यांच्या नेतृत्त्वात भरत गोगावले निवडून आले, आज फक्त त्यांचे राजकीय अस्तित्तव टिकवण्यााठी ते अशी वक्तव्ये करत असल्याचा टोला सावंत यांनी लगावला आहे. पण ते अशी वक्तव्ये करत असताना दीपक केसरकर यांनी कोणतीच मध्यस्थी केली नाही, याची खंत वाटते, असंही सावंतांनी म्हटलं आहे.
आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा
नारायण राणे हे आमचे आदरस्थान असून त्यांच्याबद्दल जाहीर सभेत अशा पद्धतीने शब्द वापरणे हे अत्यंत दु्र्दैवी आहे. नाररायण राणेंचा राजकीय इतिहास आणि त्यांच्यी कार्यशैलीवर केवळ आमच्या पक्षाचेच नव्हे तर विरोधी पक्षाचे नेतेही कौतुक करतात. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा पर्यंतचा प्रवास आहे. ते आता खासदार असून यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांवर असंवेदनशील आणि आक्षेपार्ह भाषेत एक मंत्र्याने आरोप करणे योग्य नाही, असंही सावंत यांनी म्हटलं आहे. गोगावलेंच्या अशा वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपह सावंत यांनी केला आहे.
तर मंत्री गोगावले यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या विधानानंतर जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गोगावले यांनी खासदार नारायणराव राणे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा महायुतीतील पुढील चर्चा विसराव्यात, असा इशारा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ भाजपची नसून सर्व घटक पक्षांची आहे, हे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी गोगावले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून त्यांना आठ दिवसांत माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा शिवसेना कार्यालयासमोर ‘तिरडी आंदोलन’ करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. नारायण राणे यांच्याबाबत वक्तव्य करताना गोगावले यांनी संयम बाळगावा आणि महायुतीचा भाग असताना अशी वक्तव्ये टाळावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.