mp sanjay raut on c p Radhakrishnan Vice Presidential Election Candidacy
मुंबई : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यानंतर एनडीए कोणाला संधी देणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील भाजपने धक्कातंत्र वापरत अनपेक्षित नाव जाहीर केले. यावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले, “आमचा पक्ष त्यांना पाठिंबा का देईल? सीपी राधाकृष्णन हे निश्चितच महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, एक अतिशय संतुलित व्यक्तिमत्व आहे. जर महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद होईल, पण निवडणूक होईल.” अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि ते म्हणाले की,” ते खूप चांगले व्यक्तिमत्व असलेले, वादग्रस्त नसलेले व्यक्ती आहेत. त्यांना भरपूर अनुभव आहे. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत इंडिया अलायन्स निर्णय घेईल, तो निर्णय काय असेल हे मी सांगू शकत नाही, परंतु आज आपण त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. देशात उपराष्ट्रपती पदापेक्षाही गंभीर मुद्दा आहे, मत चोरीचा मुद्दा, आणि आम्हाला त्यापासून लक्ष हटवायचे नाही,” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोग आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वादावर देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “तुम्ही राहुल गांधींकडे अॅफिडेव्हीट मागताय, या देशातील ८० कोटी जनता अॅफिडेव्हीट द्यायला तयार आहे. याला मग्रुरीही म्हणतात. ही मग्रुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावर बसलेल्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा अॅरॉगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहेत, त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. अनुराग ठाकूर यांनीही तोच आरोप केला आहे. त्यांच्याकडे अॅफिडेव्हीट मागायची हिंमत आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांची बैठक
उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख आहे. एनडीएने सीपी राधाकृष्णन यांचे नाव जाहीर केले आहे. विरोधी आघाडी ‘इंडिया’नेही सक्रियता दाखवली आहे आणि आज राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात एक विशेष बैठक बोलावली आहे ज्यामध्ये संयुक्त उमेदवारावर चर्चा केली जाणार आहे.