आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
नाशिक : राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाचे निर्धार शिबीर पार पडत आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबिराबाबत मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “या निर्धार शिबिरातून नक्कीच मार्गदर्शन आणि दिशा, प्रेरणा, उत्साह मिळेल. संघर्ष आणि लढण्याची तयारी बाबत पक्षप्रमुख जिद्द जगावणारे दिशादर्शन भाषण होणार आहे. आम्ही लढणारे लोक आहोत. सत्ता आमचा ऑक्सिजन नाही. शिवसेना सत्तेवर फार कमी वेळा गेली मात्र संघर्ष करण्यात आमचे आयुष्य केलं आहे. सत्तेसाठी काही जण तिकडे गेले. काहीजण लाचारी हुजरेगिरी करतांना आम्ही पाहतोय,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “काहीजण कुंपणावर असतात आणि उड्या मारतात. त्यादृष्टीने आजचे शिबीर महत्वाचे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे राज्याची जनता अस्वस्थ आहे. सत्ता परिवर्तन झाले त्याच्याशी जनता सहमत नाही. जनतेला आम्हाला बरोबर घ्यायचे आहे. आगामी निवडणूक म्हणून अधिवेशन घेण्यात आलेले नाही तर पक्षबांधणीसाठी शिबिर महत्त्वाचे आहे. शिबिराला अडथळे आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. मात्र असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबीर यशस्वी करत आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी राज्यातील इतर नेत्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “हे लोकं आम्हाला घाबरतात. त्यांना शिवसेनेची भीती आहे. दर्गे हटविण्यासाठी आजचा दिवस का? मशिदीवर काय बुलडोझर चालवता? कारवाई नंतर करू शकत होते मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला. नाशिकमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरे आले आहेत. म्हणजे तुम्ही जळतात, डरपोक आहेत. १५ दिवसांपासून आजचा मुहूर्त काढला. भाजपचे लोक याबाबत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. दंगल बाबत मुहूर्त काढतात. अशा प्रकारे दंगली घडू नये. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी यांना पोटसुळ आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “त्यांनी आमरस पुरीचा बेत होता. विचारा कुणालाही. याबाबत युती झाल्यावर बोलू. युती होणार की नाही हे देवेंद्र फडणवीस ठरवतील अमित शाह हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह 3 पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा मोठा विक्रम आहे. अधूनमधून ते रामदास आठवले यांचा देखील पक्ष चालवतात,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.