'भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे'; विजय वडेट्टीवार यांचा टोला (फोटो - सोशल मीडिया)
चंद्रपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस विधीमंडळ नेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. ‘त्या कुत्र्याला इतकी काय दुर्बुध्दी सुचली, कुणाला चावावे कळले नाही. याचे वाईट वाटते. त्यामुळे भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी सरकारने केली पाहिजे’, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते वडेट्टीवार चंद्रपुरात शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘दिवगंत लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका होत्या. छान गायच्या. जनतेचा त्यांना प्रतिसाद होता. हे सर्व आम्ही मान्य करतो. मात्र, सामाजिक योगदानाचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील पेडर रस्त्यावरच्या उड्डाणपुलाला त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी विरोध केला होता. विशेष म्हणजे, तेव्हा लता मंगेशकर यांनी देश सोडण्याची धमकीही दिली होती. मंगेशकर यांचे सामाजिक योगदान नाही. या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याच्या घटनेवर वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. मात्र, या प्रामाणिक प्राण्याने भिडे गुरुजी यांचा इतका का राग धरला याची देखील चौकशी झाली पाहिजे’.
संभाजी भिडे कोण आहेत?
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे सर्व पक्षांतील राजकारण्यांशी संबंध होते. पण ते राजकारणात आले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी भिडे यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडेंना गुरुजी म्हणतात. उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजी भिडे यांच्याशी चांगले संबंध होते. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि राष्ट्रवादी नेते आर.आर. पाटील हे त्यांच्याशी जवळचे नाते राहिले आहेत.