mp sanjay raut aggresive over August 15 independence Day meat Banned in Maharashtra
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही नेते हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत तर काहींचे शिवीगाळ व मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गट हा वादग्रस्त नेत्यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार आहे. भ्रष्टाचारी नेत्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या आंदोलनातून केली जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी केल्याचा आरोप देखील केला जात आहे. यावरुन देखील ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आज महत्त्वाची दोन आंदोलनं होत आहेत. महाराष्ट्रात सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन आहे. राज्यभरात हे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच दिल्लीत इंडिया आघाडीचे निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढला जाणार आहे. संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहोत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवतंय, सरकारच्या दबावाखाली काम करतंय, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांतील घोटाळे समोर येतात,” असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ईव्हीएम संदर्भातील प्रश्न निर्माण होतात, त्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचे हस्तक म्हणून काम करतंय. हे जनजागृतीपर आंदोलन आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे, यासाठी हा दिल्लीतील मोर्चा आहे. आम्ही महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला पुरावे दिले, पण त्यांनी काय केलं. हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडुळ आहे. निवडणूक आयोगावर आमचा स्वत:चा विश्वास नाही. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे कसं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं, हे आम्ही पाहिलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला या गोष्टी सांगू नये. निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आणि प्रवक्ता आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारलं असेल तर त्यांनी सांगावं. या संपूर्ण देशातील विरोधी पक्ष हा एकत्र एकवटला आहे आणि निवडणूक आयोगाविरुद्ध लढाई लढत आहे. निवडणूक आयोगाचे जे कोणी लाभार्थी आहेत, त्यापैकी एक हे देवेंद्र फडणवीस आहेत. ते निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी आहेत. तेव्हा दरोड्यातील लाभार्थी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे चोरीचा माल आहे. चोराने गप्प राहिले पाहिजे,” असा टोला देखील खासदार राऊत यांनी भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.