
mp sanjay raut target mahayuti government over delhi visit political news
Sanjay Raut Marathi News : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे काल (दि.24) दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी JNU मधील छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचे उदघाटन केले. मात्र यावेळी सभागृहाच्या बाहेर स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्यातील मंत्र्यांबाबत देखील मोठा दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी खासदार राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील नेते हे दिल्ली दौरे करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरे केले आहेत. “मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं आणि कुणाला वगळायचं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाहांच्या हाती आहे,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी चार मंत्र्यांची नावे घेत त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून या मंत्रिमंडळातील चार मंत्री जाणार असल्याचे सांगत आहे. संजय शिरसाठ, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागणार आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा सुरु आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे, हे ओझे देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलिकडं गेलं आहे. हे ओझं पेलवतं नाही पण ते फेकता ही येत नाही. खरंतर त्यांचं 137 चं संख्याबळ आहे. त्यांना अशाप्रकारे ओझ्याने वाकून जाण्याची गरज नाही. ते वाकले असले तरी ते त्यांचे काम करत आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी ॲम्बुलन्स घोटाळ्याचा मोठा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले आहे. ते म्हणाले की, “काल झारखंड येथून एक पथक आले. तिथल्या एसीबीचं हे पथकं होतं. त्यांनी अमित साळुंके या व्यक्तीला अटक केली. सुमित फॅसेलिटीजचे नाव त्यात समोर येत आहे. राज्यात 800 कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा झाला. 100-200 कोटींचे टेंडर 800 कोटींवर नेण्यात आले. 650 कोटींनी टेंडर वाढवण्यात आले. सुमीत फॅसेलिटीज, 108 नंबर ॲम्बुलन्स, तुम्हाला आठवते का? तर त्याचे सूत्रधार हे अमित साळुंके आहेत. हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन आहे. त्याचा कणा हा अमित साळुंके असल्याचा दावा राऊतांनी यावेळी केला. झारखंड मद्य घोटाळ्यात हे पथक येथे आले आणि अमित साळुंके याला अटक केली. ॲम्बुलन्स घोटाळ्यातील पैसा शिंदेकडे वळवला की त्याला इतरत्र पाय फुटले याचा तपास होणार आहे,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.