
MP Sanjay Raut target Mahayuti over manikrao kokate case maharashtra politics
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या घोटाळ्यावर भाष्य करत टीकास्त्र डागले. खासदार संजय राऊत म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी भाष्य केले. अजूनही वाल्मिक कराड तुरुंगात आहे. अजूनही खटला संपलेला नाही. अशावेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरुपाचे आरोप होते, त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचं पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही. फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री, भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी मुळे गेले. ही या सरकारला लागलेली काळीमा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
हे देखील वाचा : ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न; भाजपच्या नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
पुढे ते म्हणाले की, खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत. त्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतर ही अनेक विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसला धक्का ! प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये केला प्रवेश
खासदार संजय राऊत यांनी महायुतीमध्ये माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे. सरकार त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या मागे उभे राहतो हा संदेश या प्रकरणातून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी, जे आमदार-खासदार, मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी आमच्या पक्षात यावं, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल हाच तो संदेश आहे, तसं नसतं तर काल अमित शाह धनंजय मुंडे यांना भेटले नसते. या भेटीतूनही तोच संदेश देण्यात आला आहे. काही करा आणि आमच्याकडे या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत. तर दिल्लीत अमित शाह हे देत आहेत, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.