mp sanjay raut vs bjp chandrashekhar bawankule maharashtra political news
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान सीमेवर देखील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र केंद्र सरकार योग्य पाऊले उचलत नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये राजकीय वाद विवाद सुरु झाला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार देत असलेले प्रत्युत्तर हे काय बदला आहे का? असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करतात. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का? असा सवाल संजय राऊतांनी केला. यानंतर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांचे बोलणे सामाजिक स्वास्थ्य खराब करणारे आहे असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संजय राऊतांना टीकाटिपणी करण्याव्यतिरिक्त काही येत नाही. संजय राऊत यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होते. संजय राऊत आता काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे संविधान स्वीकारले, त्यामुळे ते काँग्रेसची भाषा बोलतात. ज्या पद्धतीने संजय राऊत बोलत आहे, त्यांना मोदीजी अजून समजतच नाहीत, ते समजायला वेळ लागेल, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाचं नाही. बावनकुळे या मंडळींनी पैशाचा आणि सत्तेचा वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूद आणली. आजचा भाजप हा ओरिजनल पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडणे आणि आपल्या सोबत भ्रष्टाचारांना देखील घेतले आणि आपला पक्ष वाढवला. मात्र, उद्या यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूद उतरलेली असणार आहे. तुमचा पक्ष विचार धारेवर वाढवा, दुसऱ्यांचे पक्ष चोरी का करतात? एवढं करून सुद्धा त्यांची भूक भागत नाही. आणि बावनकुळे यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाही. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, आता ते शिंदे यांची शिवसेना देखील फोडणार आहेत व ते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडणार आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.