ncp ajit pawar leader sunil tatkare reaction on waqf amendment bill
मुंबई : वक्फ सुधारणा विधेयकावरुन देशामध्ये राजकारण रंगले आहे. लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. पहाटे हे विधेयक पारित करण्यात आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यावरुन देशामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज (दि.04) हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित होणार का याची संपूर्ण देशभरातून उत्सुकता आहे. ही विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला 272 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. भाजपकडे 240 सदस्य आहेत, मात्र भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. मात्र यामध्ये एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यामध्ये अनेक अनैसर्गिक युती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता वक्फ सुधारणा विधेयकाबाबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. याबाबत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या पुरोगामी विचार असणाऱ्या राष्ट्रवादीने देखील वक्फ बोर्ड सुधारित विधेयकाला पाठिंबा दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड सुधारित कायद्याला पाठिंबा असल्याची भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे, मुस्लिम समाजामध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधेयकाची अंमलबजावणी होईल. मुस्लिम समाजाला न्याय देणारे हे विधेयक आहे, समाज्याच्या प्रगतीसाठी हे विधेयक आहे. आम्ही पाठिंबा दिला, समर्थन केलं, बोलल्याने समर्थन आहे हे सिद्ध होते,” असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “वक्फ बोर्ड सुधारित विधेयकाबाबत इतर पक्षांची भूमिका काय होती, त्याबाबत मी बोलणार नाही. कोंडी कोणाची झाली त्यावरही बोलणार नाही. हे विधेयक धार्मिक नाही, वक्फ बाबत वास्तविकता समोर येण्यासाठी हे विधेयक आहे,” असे स्पष्ट मत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकाला विरोध दर्शवला आहे. याबाबत मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ, फावडी घेऊन जातात मग वरुन आदेश येतो की थांबा खोदू नका. मग परत माती टाकतात. मशिदीत घुसून मारणार सांगतात, मारायला गेलं की सांगायचं थांबा, सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना एकमेकांमध्ये लढवायचं आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे चाललं आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत असा आमचा अनुभव आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.