NCP Dattatreya Bharane reacted after took charge of the Agriculture Ministry political news
पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. वादग्रस्त विधाने आणि बेताल वागणे यामुळे महायुतीचे सत्ताधारी नेते व मंत्री हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. यामध्ये माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. माणिकराव कोकाटे यांना विधीनमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळणे हे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 22 मिनिटे गेम खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा गेम झाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या असंवेदनशील वर्तनामुळे त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषीमंत्रिपद देण्यात आले आहे. पद मिळाल्यानंतर नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. माणिकराव कोकाटे यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन त्यांना कृषीमंत्रिपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. यासंबंधित निर्णय जाहीर झाल्यानंतर नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भरणे म्हणाले की, आज सकाळीच ही आनंदवार्ता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो. या सर्वांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळतं, यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकतो, अशा भावना नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रण भरणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे माध्यमांनी नवीन कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत प्रश्न विचारले. तसेच कृषी खात्याचे विविध प्रकारे मोठे नुकसान झाले आहे. हे रोखण्यासाठी तुमची नियुक्ती करण्यात आली असल्याबाबत माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कल्पना नाही
महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे अडचणीत आले. तर माणिकराव कोकाटे हे थेट शासनाला भिकारी म्हणाले. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला तर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, माणिकराव कोकाटे हे आमचे ज्येष्ठ आहेत. वरिष्ठांनी त्यांना मंत्रिपद दिलं हे योग्यचं आहे. तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद मागणी केली याची मला कल्पना नाही, असे म्हणत या विषयांवर जास्त बोलणे दत्तात्रण भरणे यांनी टाळले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज कृषीमंत्र्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला संकल्प सोडला. त्यांनी त्यांचे इंदापूरविषयीचे प्रेम व्यक्त केले. मंत्री भरणे म्हणाले की, “मी शेतकरी कुटुंबातील असून मला बारामतीकरांनी (अजितदादांनी) भरभरून दिलं. पवार कुटुंबाचं माझ्यावर भरभरून प्रेम राहिलं आहे. विशेषतः अजितदादांनी भरभरून दिले. आता इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार.” असा निश्चय दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. बारामतीसारखी इंदापूरची प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.