खात्यांची आदलाबदल ! माणिकराव कोकाटेंचं खातं दत्तात्रय भरणेंना अन् भरणेंचं कोकाटेंना
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषिमंत्रीपद असताना त्यांनी विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप होत होता. यावरूनच त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात होता. असे असताना अखेर त्यांना कृषिमंत्रिपदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषिमंत्रिपदाचा कार्यभार असताना अनेक विधानांमुळे ते चर्चेत आले होते. नुकतेच त्यांनी एक स्पष्टीकरण देताना शासन भिकारी असा देखील उल्लेख केला होता. यापूर्वीही अनेकदा त्यांनी अशाप्रकारे आक्षेपार्ह विधानं केली आहेत. त्यातच रमी खेळण्याच्या आरोपांवरून आणखीच टीका करण्यात आली. विरोधकांनाही आयते कोलीतच मिळाले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी विभागाचा पदभार काढून घेतला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर कृषी विभागाचा कार्यभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले दत्तात्रय भरणे यांच्याकडे अगोदरच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. मात्र, नवीन सरकारच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली. त्यानुसार, त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता त्यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्याकडील क्रीडा खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे.
वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत
ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त विधान यामुळे विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटेंवर टीका सुरूच ठेवली होती. विरोधकांकडून त्यांच्या राजीनामाची मागणी केली जात होती. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेल्याचे समोर आले होते. अखेर माणिकराव कोकाटे यांचे कृषिमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.