NCP Dhananjay Munde Shayari Beed Speech Political News Update
Dhananjay Munde Shayari : बीड : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहेत. बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देखील घेण्यात आला. यावर आता धनंजय मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी शायरीमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चारोळी म्हणत विरोधकांना चोख उत्तर दिले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “खरंतर मी खूप दिवसांनी बोलतोय. न बोलण्याची माझी डबल सेंच्युरी झाली आहे. मागचे दोनशे दिवस मी न बोलता काढले आहेत. आणि या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिव्हारी लागली, ती अजूनही माझ्या मनामध्ये आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी ही बदनामी केली भले ते या बीडच्या मातीतील असेल किंवा नसेल त्याला एवढंच सांगायचं आहे की, वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का?” असा भावनिक सवाल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
“मी तटकरे साहेबांना विनंती केली होती की मी आज भाषण देणार नाही. मी कारण सांगितले नाही पण मला तुम्हाला कारण सांगावेच लागेल. माझ्या मनात एक प्रश्न होता की मी इथे बोलावे की मैदानात बोलावे. हे बरे झाले की दिला अंधार तू इतका मला…एक ठिणगी आत लागली उजळायला…ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रती आता मी चार ओळीत सांगतो,” असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील या सभेमध्ये त्यांनी शायरीमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंदीमध्ये शायरी म्हणत ते म्हणाले की, “तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम्हारी लौ से ये लोहा पिघल नहीं सकता,” अशा आक्रमक पवित्रामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद अखेर व्यक्त केली आहे.