उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Uddhav Thackeray Interview : मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर धारावी प्रकल्प, मुंबई निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत देखील प्रश्न केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत देखील मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रश्न केला. यावेळी ते म्हणाले की, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. म्हणून 370 हटवण्याबाबत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. या हल्ल्यावेळी बेफिकरी आणि गाफिलपणा झाला त्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही. सैन्याच्या कारवाईला आणि शौर्याला सलाम आहे. त्यामध्ये काहीच वाद नाही. परंतू ज्या बिंधास्तपणे पर्यटक गेले होते त्यांच्यावर गोळीबार झाला याला जबाबदार कोण आहे? तीन महिने झाल्यानंतर देखील या अतिरेक्यांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. अतिरेकी येऊन मारुन गेले. पण गेले कुठे? हे सरकारचं अपयश आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूरला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता मात्र अजूनही त्याचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यावेळी परिस्थिती अशीच होती. उद्या पाकिस्तानला आपण मोडू टाकू अन् आपलं स्वप्न पूर्ण होईल असं वाटत होतं. मात्र नंतर असं काय घडलं की सैन्याचे पाय तुम्ही मागे ओढले हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. सैन्याची पराक्रम करत आतमध्ये घुसलं होतं मात्र त्यांना थांबवलं गेलं. आपल्या सैन्याच्या शौर्यावर स्वप्नामध्ये सुद्धा संशय घेता येणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे सातत्याने सांगत आहे की त्यांनी युद्ध थांबवलं म्हणून. व्यापारासाठी थांबवलं असं सांगितलं जात आहे. त्यांना देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटत आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीचा व्यापार, सत्तेचा व्यापार आणि आता देशाचाही व्यापार करत आहेत. हे कचखाऊ नेतृत्व आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी निवृत्तीबाबत संकेत देणारे वक्तव्य केले होते. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीचे संकेत दिले जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपला पंतप्रधान आहेत पण देशाला पंतप्रधान नाहीत. नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीची शाल मोहन भागवत यांनी घातलेली आहे. आता बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पावले आहेत ते कळेल आता. मोहन भागवतही निवृत्त होण्याच्या विचारात आहेत अशावेळी मोदी शब्द पाळतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे म्हणतात, आता यांची पावलं वाकडी पडतात का? ते कळेल,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.