jitendra awhad target dhanajay munde for beed murder case
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. मागील दोन महिन्यांपासून यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचा आरोप करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्या मदतीसाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज धावून आले आहेत. मात्र त्यांनी केलेली राजकीय टिप्पणी नेत्यांना आवडली नसून अनेकांनी यावरुन टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटनंतर नामदेव शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधून धनंजय मुंडे हे गुन्हेगार नसल्याचे म्हटले आहे. मात्र भगवान गडाच्या महंतांनी राजकीय टिप्पणी करणे हे विरोधकांना आणि मयत संतोष देशमुख यांच्या परिवाराला पटलेले नाही. या प्रकरणात ज्यांनी संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी अशी मागणी देखील नामदेव शास्त्री महाराज यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
माध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहिजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत त्या गादीला मोठी परंपरा आहे,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटारसायकलवर येऊन बसलं हे सगळ्यांना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात,” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
डॉ. नामदेव महाराज शास्त्रीय यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले होते.