धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान; म्हणाले... (File Photo : Chhagan Bhujbal)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र, छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रीपद मिळालं नाही. त्यानंतर नाराज झालेले भुजबळ या ना त्या कारणाने आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. त्यातच त्यांना राज्यपाल केलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे,” अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
दरम्यान, ‘नाशिकमध्ये तुम्ही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्हालाच उभं राहावं लागेल, असं मला सांगितलं होतं. पण महिना उलटून गेला तरीही माझं नाव जाहीर झालं नाही. त्यामुळे मग मीच निवडणुकीतून माघार घेतली,’ याचा पुनरुल्लेख भुजबळांनी केला. लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं लढवली होती.
‘हा तर माझ्या तोंडाला…’
छगन भुजबळ राज्यपाल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की, राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे आहे. ते खूप मोठे पद आहे. मी त्या पदाचा अवमान करत नाही. पण माझे काम गोर गरिबांचे कल्याण करणे आहे. राज्यपाल झालो तर भटक्या विमुक्त जातीसाठी मी काही करू शकत नाही. यामुळे मी सध्या आहे, तसाच बरा आहे.
…तरीही माझा राजीनामा घेतला
“तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत व ते सिद्धही झाले नाही. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो,” अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.