नाशिक : राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा महिने होऊन गेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचे घोंगडे भिजत पडले आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन चढाओढ दिसून येते. यानंतर राष्ट्रवादी छन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये थेट एन्ट्री झाल्यामुळे हा तिढा आणखी वाढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्रिपदाबाबत स्पष्ट नकार दिला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा देखील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या नाशकात फेऱ्या वाढल्या आहेत. छगन भुजबळ यांनी देखील द्वारका सर्कलची पाहणी केली. यामुळे चर्चांना उधाण आले. माध्यमांशी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कुंभमेळ्यापासून शहरातील सर्व प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. सर्कल हटवले आहे. तसेच तिथे सिग्नल यंत्रणा सुरू होण्यासाठी आठ दिवस द्यावे लागतील असे देखील भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर पालकमंत्रिपदाबाबत बोलतान भुजबळ म्हणाले की, मी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छूक नाही. मला नाशिकसाठी जे काही करायचे आहे ते मी करत आहे, असे विधान भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे आता पालकमंत्रिपदाची लढत ही तिहेरी नसून दुहेरी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सात दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते. यानंतर मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आता आंदोलन सोडले आहे. याबाबत भुजबळ म्हणाले की, आर्थिक संदर्भात प्रश्न मंत्रिमंडळात सोडवले जातात. तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. त्याचबरोबर भुजबळ म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. ढगफुटी देखील काही ठिकाणी झाली आहे. त्याची पाहणी केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिवसेनेमधील अंतर्गत विवादावर छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, मी 35 वर्षापासून शिवसेना सोडली आहे मला त्याची माहिती नाही. शिवसेनेत आता कोण निर्णय घेतात ते मला माहित नाही. मी बाहेर आल्यानंतर तिथे पुन्हा जाण्याचा प्रश्न नाही. नारायण राणे जाण्याचा प्रश्न देखील अजिबात नाही. मी शिवसेना सोडली त्यानंतर मोठे रणकंदन झाले होते. बाळासाहेब आणि आमचे देखील मोठे वाद झाले होते. मात्र नंतरच्या काळात आम्ही एकत्र बसून आम्ही तो संपूर्ण वाद मिटवला. पण त्या वेळा शिवसेनेचे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे घेत होते, असे देखील स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.