NCP MLA Rohit Pawar share video of student on Anti-corruption speech
मुंबई : देशामध्ये नुकताच स्वातंत्र्य़दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्ये विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. याच दिवशीच्या एका शाळेतील चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चिमुकल्या मुलीने देशातील भ्रष्टाचारावर अत्यंत प्रभावी भाषण दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चिमुकली विद्यार्थींनी म्हणत आहे की, “भ्रष्टाचार..हे जमलेल्या माझ्या लहान मित्रांना कदाचित या शब्दाचा अर्थ माहित नसेल. म्हणजे मला सुद्धा नाही माहिती कारण मी सुद्धा लहान आहे ना! पण बाबा बोलतात भ्रष्ट्राचारामुळे देश पोखरत चालला आहे. जेवढं इंग्रजांनी आपल्याला नसेल लुटलं तेवढं या भ्रष्ट्राचाराने लुटलं आहे. प्रत्येक शासनाच्या गोष्टीत गडबड, गोंधळ आणि भ्रष्टाचार होतात. यांचे घोटाळे करोड, 100 करोड, हजार करोड अन् हजारो करोड आहेत. हे घोटाळेबाज, एवढे घोटाळे करुन…एवढं पचवून…ढेकरंही देत नाहीत,” असा टोला या चिमुकलीने लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ती म्हणाली की, “जेवढी आपली लोकसंख्या आहे…जेवढा आपण सगळ्या गोष्टींवर टॅक्स भरतो हे पाहून आपण जगातील महासत्ता कधीच बनायला हवं होतं. पण या घोटाळेबाजांमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत आहे. जे आपल्या देशासाठी लढले..ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहूती दिली. त्यांच्या डोक्यात दिवसरात्र एकच गोष्ट असेल की माझा भारत स्वतंत्र कसा होईल? आणि या घोटाळेबाजांच्या डोक्यात दिवसरात्र एकच गोष्ट असेल की आपल्या सदृढ भारताला कुपोषित कसे केले जातील असाच विचार असतो. आणि हे सगळं ते आरामात करु शकतात. कारण त्यांना माहिती आहे की भारतातील भोळीभाबडी लोकं ही गांधींच्या तीन माकडांप्रमाणे आहेत,” असे स्पष्ट शब्दांत या चिमुकलीने आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे या चिमुकलीने भारतीय लोकांना सल्ला देत सांगितले की, “भारतीय लोक गांधींजींच्या तीन माकडांप्रमाणे आहेत. ते काही आपल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार नाहीत..ऐकणार नाहीत…आणि बघणार नाहीत. कारण ते स्वतःच्याच समस्यांमध्ये बुडालेले असतात. बरेच लोक देशातील सामान्य लोकांना लुटून परदेशामध्ये सेटल होतात. या भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोडं थोडं शिकवत असतात. कारण मला तर जास्त काही कळत नाही कारण मी तर लहानच आहे ना! पण प्रश्न जर भारताला कमकुवत करायचा असेल तर भ्रष्ट्राचार बघू नका..ऐकू नका..बोलू नका. असलं माकड होऊन जगायला मला चालणार नाही. माझ्यासाठी राष्ट्रप्रथम..राष्ट्र सर्वोत्तम. मी या व्यवस्थेच्या विरुद्ध नक्की लढे,” असे म्हणत या चिमुकल्या शालेय मुलीने अगदी मोलाचा संदेश दिला आहे.
भ्रष्टाचाराविरोधात आम्ही तर आज लढतच आहोत पण आपली पुढची पिढीही त्यासाठी तयार होतेय, हे बघून भारी वाटतंय… व्हॉटस्ॲपवर आलेला मराठी शाळेतल्या चिमुकलीचा हा व्हिडीओ सत्ताधाऱ्यांनी तर आवर्जून बघावा…!#भ्रष्टाचारमुक्तभारत #भ्रष्टाचारविरोधी_लढा pic.twitter.com/eAtwMZw2SF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2025
सोशल मीडियावर या मराठी चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी रोहित पवारांनी लिहिले आहे की, भ्रष्टाचाराविरोधात आम्ही तर आज लढतच आहोत पण आपली पुढची पिढीही त्यासाठी तयार होतेय, हे बघून भारी वाटतंय… व्हॉटस्ॲपवर आलेला मराठी शाळेतल्या चिमुकलीचा हा व्हिडीओ सत्ताधाऱ्यांनी तर आवर्जून बघावा…! असे रोहित पवारांनी लिहिले आहे.