संग्रहित फोटो
बीड : गेल्या काही महिन्यापासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अशातच आता बीडमधून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विलास मस्के असं गंभीर असलेल्या समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून विलास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. धारधार शस्त्राने वार केले आहेत. बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला आहे.
विलास मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीड मधील वैद्यकीय मदत कक्षात गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी विलास मस्के यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फिर्यादी सूरज रामदास घोडे (२५, रा. घरकुल, चिखली) यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, रा. घरकुल, चिखली), राजा युवराज हजारे (२८, रा. घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, रा. थेरगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
मध्यस्थी करणार्या ज्येष्ठावर हत्याराने वार
घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला येरवड्यातील यशवंतनगर येथील डायमंड चौक येथे तीन ते चार जण आपआपसात वाद घालत असताना दिसले. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यावरच धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमन अनिल भालेराव (रा. यशवंतनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश रामचंद्र साबळे (६३, रा. डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.