amol kohe target mahayuti
जळगाव : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचार, सभा आणि दौरे करत नेते प्रचार करत आहेत. शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा सुरु असून अजित पवार यांच्या गटाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. शिवस्वराज्य यात्रेतून खासदार व शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे जोरदार प्रचार करत आहेत. अमोल कोल्हे यांची यात्रा जळगावमध्ये पोहोचली आहे. जळगावमधील चोपडा या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केले. आपल्या भाषणामध्ये अमोल कोल्हे यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली आहे.
राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर शिंदे गटामध्ये सामील झालेल्या नेत्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओके अशी आरोळी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून उठवण्यात आली. यावरुन जोरदार राजकारम तापले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा हाच मुद्दा उचलून धरत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. 50 खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके, अशी आरोळी देत अमोल कोल्हे यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.
जनता कहती मैं बिचारी हुँ
आपल्या खास शैलीमध्ये खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ठेकेदार कहता है मे भिकारी हुँ. अफसर कहता है मै पुजारी हूँ. आजकाल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मै तो व्यापारी हुँ…, जनता कहती मैं बिचारी हुँ… जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या पाच आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटलं होतं की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले. ५० खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके. राष्ट्रवादीचा एक आमदार आणि जळगाव जिल्हा शरद पवार यांच्या ताकतीवर निवडून आला मात्र मंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी गद्दारी केली…, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी मंत्री अनिल पाटील यांना लगावला आहे.
भाजपची सत्ता असलेल्या राज्यात हे
पुढे त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. खासदार कोल्हे म्हणाले की,”जर तुम्हाला गुजरातचे चाकरी करायचे असेल तर मत मागायला इकडे कशाला येता गुजरातमध्ये जा… बहीण जर लाडकी आहे तर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे. आज सुरक्षिततेचा हक्क तिला मिळाला पाहिजे. सध्याचे सरकार कसं चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही, अशी टीका कोल्हेंनी केली. पुढे ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातल्या सहा आमदारांनी गद्दारीचा वार हा जनतेच्या काळजावर केला आहे. याचे उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावा लागेल. सीमेचा रक्षण करणारा जवानाच्या एका भावी पत्नीचे पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषण करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा सत्ता असलेल्या राज्यात हे झालं. गद्दार आमदार म्हणत होते की आम्ही हिंदूंसाठी केली आणि अत्याचार होतो का तेव्हा कुठे गेले होते यांचे हिंदुत्व…. तेव्हा लाज वाटली नाही का तुम्हाला… छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारा या महाराष्ट्रात दोन चिमुकलींवर अत्याचारवर होतो. तेव्हा तुम्ही गप्प कसे? हिंदुत्व सांगणारे तुम्ही, मग तुम्हाला का नाही बोलता आलं? गृहविभागाचा निषेध करतो,” अशा कडक शब्दांत अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.