
तासगावच्या भविष्यासाठी जनतेचा ठाम विश्वास : ज्योती पाटील
तासगाव : तासगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती अजय पाटील यांच्या ‘घर-घर संपर्क मोहिमेला’ प्रचंड प्रतिसाद मिळत असून संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिक उत्साहवर्धक बनत आहे. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या दारात जाऊन संवाद साधण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शांत आणि संयमी स्वभावातून त्या प्रत्येक मतदाराची समस्या मनापासून ऐकतात आणि त्यावर वास्तववादी उपाययोजना मांडतात. त्यांच्या या प्रभावी शैलीमुळे नागरिकांशी दृढ नातं निर्माण होत असून तासगावकर त्यांना आपुलकीने प्रतिसाद देत आहेत.
माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख उपक्रम आणि शहरातील सातत्यपूर्ण विकासामुळे पाटील कुटुंबाविषयी जनतेत आजही प्रचंड विश्वास आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या क्षेत्रांतील कामांची छाप अजूनही ताजी आहे. याच भावनेच्या आधारावर ज्योती पाटील यांच्या प्रचार मोहिमेला अधिक बळ मिळत असून नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांना समर्थन देताना दिसत आहेत.
हेदेखील वाचा : Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
भेटीदरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत, व्यावसायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. विकासाचा स्पष्ट रोडमॅप, महिलांसाठी उपयुक्त योजना, तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचे नियोजन आणि स्वच्छ-सुंदर तासगावाचा दृष्टीकोन यामुळे शहरात आशावादी वातावरण निर्माण होत आहे.
याच संदर्भात बोलताना ज्योती पाटील यांनी “तासगाव शहर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. तसंच बेरोजगार युवकांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊन तासगावमधून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक नियोजन तयार केले आहे,” असे नमूद केले.
एकूणच, तासगावच्या सर्वच प्रभागांत मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रचारात स्पष्टपणे जोरदार उर्जा जाणवत असून आगामी निवडणुकीत तासगावच्या विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार, अशी सर्वसामान्यांत चर्चा रंगत आहे.
हेदेखील वाचा : तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!