
Sangamner Farmers Protest, Sangamner Prant Officer Arun Unde
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आला होता. मात्र, एवढा मोठा मोर्चा दारात आलेला असतानाही जबाबदार अधिकारी गैरहजर असल्याने आंदोलकांचा पारा चढला.प्रांताधिकारी अरुण उंडे आपल्या खुर्चीवर नसल्याचे पाहून बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले.
आपल्या नेत्यांना दारात बसावे लागल्याचे पाहून मोर्च्यातील शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आणि त्यांनी थेट प्रांताधिकारी यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. संतप्त शेतकऱ्यांनी केबिनमधील खुर्च्या उचलून बाहेर फेकल्या आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोर्चा आला असताना प्रांताधिकारी गैरहजर राहतात, ही प्रशासनाची निष्काळजीपणाची परिसीमा आहे.” अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिली .
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना उफाळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठी असतानाही केवळ वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाहीये. त्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. याकडे समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी (Sub-Divisional Officer) कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. पण शेतकऱ्यांचा मोर्चा असतानाही प्रांताधिकारीच कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे शेतकऱ्यांचा संताप चांगलाच वाढला आणि आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयात आत घुसून थेट खुर्च्याची तोडफोड केली.