
राज्यात होणार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक
2 डिसेंबरला मतदान तर 3 तारखेला लागणार निकाल
2 अपक्ष उमेदवारांनी घेतली कोर्टात धाव
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या प्र. क्र. १० मधील दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे या दोन अपक्ष उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्र. क्र.१० मधील अपक्ष उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांचे उमेदवारी अर्ज किंवा नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या रचनेत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचेही अर्ज अवैध ठरवले.
उमेदवारी अर्जासोबत दलेले प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद ठरवले गेले. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली, त्यावेळी या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही अपक्ष उमेदवारांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १५ नुसार न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलात त्या प्रभागातील उमेदवार श्वेता कोरगावकर, मानसी करमरकर, राजेश चोडणकर आणि राजाराम रहाटे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.