Ravindra Dhangekar responds to Sanjay Raut's criticism Pune Politics
पुणे : पुण्यामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतर केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे महाविकास आघाडीला पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीला अटक होण्याची भीती असल्यामुळे धंगेकरांनी सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत देखील मांडले. याला आता रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. धंगेकर म्हणाले की, “नाही, त्या लोकांनी माझ्या पत्नीला अटक करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र आम्ही घाबरत नाही. ते संजय राऊत यांचं मत आहे. ते माझ्यासाठी बोलले असतील. किंवा त्यांनी माझी बाजू मांडली असेल. परंतु, ते त्यांचं मत आहे. मी घाबरलो नाही. मी स्पष्ट सांगितलं आहे की आमची चूक असेल तर खुशाल आम्हाला तुरुंगात टाका. परंतु, मी कधी चुकीचं काम केलंच नाही. त्यामुळे मला भीती वाटत नाही.” असे स्पष्ट मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते संजय राऊत?
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत. स्वत: एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, आणि त्यांच्या विरोधात काही प्रकरणं असली तर दबाव आणला जातो. आता रविंद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता फोडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली, खोटे गुन्हे टाकण्यात आले. धंगेकरांनी पक्ष सोडावा असं वातावरण तयार करण्यात आलं, त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली. त्याच भीतीपोटी, विकासकामं रखडली या सबबीखाली रविंद्र धंगेकर हे शिंदे गटात गेले. रविंद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून खरोखर सांगावं,” असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.