Sambhaji Raje Chhatrapati's target on the maharashtra political situation
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे जोरदार रंगणार आहे. राज्यामध्ये सध्या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी पक्ष असल्याचे चित्र आहे. कोणता नेता नक्की कोणत्या पक्षामध्ये आहे आणि कोणता पक्ष नक्की खरा प्रश्न असा मोठा चक्रव्हयू महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झाला आहे. त्यामध्ये आता राज्यात तिसरी आघाडी देखील निर्माण झाली आहे. प्रहार संघटना, स्वराज्य संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती निर्माण केली आहे. आता या राजकीय परिस्थितीवर एका नेत्याचे वक्तव्य राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेमध्ये आले आहे.
परिवर्तन महाशक्ती युती तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वंशज आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांची भेट झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली चर्चा झाली आहे. परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या तयारीबाबत आणि जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखडपणे भाष्य केले.
आम्ही शर्यतीतील शेवटचे घोडे
माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आमदार बच्चू कडू आणि माझी मुंबईत बैठक झाली असता आपण नावीन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू, अशी चर्चा झाली. ही चर्चा सुरु असताना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो. तेव्हा आपण वेगळा महाराष्ट्रासाठी घडवू शकतो असे समजले. “शर्यतीतील शेवटचे घोडे पुढे आले तर त्याला डार्क हॉर्स असे नाव दिले. तसे आपण डार्क हॉर्स आहोत. आपण टुकटुकचा घोडा असून कसे मागून पुढे जाणार हे कळणारही नाही. आम्ही का फक्त आयुष्यभर चळवळ चळवळ करायची? बच्चू कडू यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की, वेळप्रसंगी कुठली ती महायुती? आता थोकठोकी होणार. माझा जन्म घराण्यात झाला मात्र तुम्ही मोठे,” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.
शिवसेना बुद्रुक अन् खुर्द कोण?
पुढे त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन महायुती व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “दोन काँग्रेस, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी पक्ष यामुळे मी गोंधळून गेलो आहे. गाव दोन नावांचे असतात, तसे कोण आहेत? राष्ट्रवादी खुर्द, कोण आहेत ? राष्ट्रवादी बुद्रुक कोण आहे? शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? हे का जनतेच्या हितासाठी झाले का? तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला. माझं चॅलेंज आहे की, तुम्ही किल्ल्यांसाठी किती पैसे दिले हे सांगा. ७५ वर्षात फक्त 1 कोटी खर्च. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधकही शांत झाले,” असा घणाघात संभाजीराजे छत्रपती यांनी केला.