Satara District President Atul Bhosale will be given a grand welcome in Satara district on Friday.
कराड : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाने सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची घोषणा नुकतीच केली आहे. या निवडीनंतर ते शुक्रवार (दि.16) रोजी प्रथमच सातारा जिल्ह्यात येत असून, त्यांच्या जंगी स्वागताची तयारी भाजपा जिल्हा कमिटीने केली आहे. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत या स्वागत सोहळ्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी १० वाजता सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर सारोळा पूल येथे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे जाहीर स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर शिरवळ, खंडाळा, भुईंज फाटा, पाचवड, आनेवाडी टोल नाका, वाढे फाटा येथे ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जाणार आहे. दुपारी 12.30 वाजता सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात त्यांचे आगमन होणार आहे. तिथे स्वागत झाल्यानंतर ते भाजपाच्या जिल्हा कार्यालयास भेट देणार आहेत. त्यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, क्रांतिगुरु उस्ताद लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करतील. त्यानंतर ते जलमंदिर व सुरुची बंगला येथे सदिच्छा भेट देणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, दुपारी अडीच वाजता सातारा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, याठिकाणी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासमवेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, आनंदराव पाटील, दिलीपराव येळगावकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भरत पाटील, डॉ. प्रिया शिंदे, रामकृष्ण वेताळ, विक्रमबाबा पाटणकर आदी मान्यवरांसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकार परिषदेनंतर ते कराडकडे रवाना होणार असून, या मार्गावर अतित, काशीळ, उंब्रज, तासवडे टोल नाका, वारुंजी फाटा येथे स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल. सायंकाळी ५ वाजता कराड येथील कोल्हापूर नाक्यावर त्यांचे आगमन होणार असून, याठिकाणी ते महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करतील. पुढे शाहू चौकात राजर्षी शाहू महाराज, दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, सायंकाळी ६ वाजता ते प्रीतिसंगम घाटावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करतील. याठिकाणी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कन्या शाळेसमोर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यास, तसेच पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पोचहतील.
बैठकीला हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, सुनिषा शहा, जयकुमार शिंदे, संतोष कणसे, सुनील शिंदे, धनंजय जांभळे, रेणू येळगावकर, सचिन गाडगीळ, विजय कातवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.