जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
जललक्ष्मी जलसिंचन योजना (Jallakshmi Irrigation Scheme) ही व्याहळी, कुसगाव, एकसर आणि पसरणी परिसरातील शेतीसाठी महत्त्वाची मानली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असून, योजनेचे पाणी मिळाल्याने थेट सिंचनाबरोबरच विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही मदत होते. त्यामुळे या योजनेचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होणे आवश्यक आहे.
मात्र अनेक वर्षांपासून योजनेच्या पाइपलाइनला विविध ठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त असून त्यांची वेळेत देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. परिणामी योजनेचा शंभर टक्के लाभ संबंधित गावांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
पश्चिम भागात तुलनेने मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापूर्वी या गळतीकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र बदलते पर्जन्यमान आणि गतवर्षी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती पाहता आता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी केवळ व्यवस्थापनातील त्रुटी आणि दुरुस्तीच्या अभावामुळे वाया जाणे परवडणारे नाही.
विशेषतः व्याहळी, कुसगाव, एकसर आणि पसरणी या गावांपर्यंत योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचणे गरजेचे आहे. गळती तातडीने रोखून पाइपलाइन आणि व्हॉल्व्हची आवश्यक दुरुस्ती केल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळू शकतो. तसेच विहिरींच्या पाणीपातळीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जललक्ष्मी योजनेतील त्रुटींबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदाही वेळेत दुरुस्ती झाली नाही आणि पाण्याची नासाडी अशीच सुरू राहिली, तर कृष्णेच्या कुशीत असलेल्या वाईच्या पश्चिम भागालाही भविष्यात पाणीटंचाईच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून जललक्ष्मी सिंचन योजनेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.






