
seat-sharing agreement between Thackeray brothers alliance is final for BMC election
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंमध्ये सर्व जागांच्या वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली असून जागावाटप संपले असल्याचे जाहीर केले. खासदार राऊत म्हणाले की, “काल रात्री जागा वाटप पूर्ण झालंय.शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला,” असं संजय राऊतांनी सांगितले.
हे देखील वाचा : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
पुढे ते म्हणाले की, “युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हणाले. आज रात्री युती जाहीर करायची किंवा मग उद्या, हे आत्ता ठरवू, “असे सूचक वक्तव्य खासदार राऊत यांनी केले. त्याचबरोबर फक्त मुंबईमध्ये नाही तर इतर शहरांमध्ये देखील ठाकरे गट आणि मनसेची युती असणार आहे. राऊत म्हणाले की, “मुंबईसह अनेक भागात कार्यकर्त्ये कामालाही लागले आहेत. सेना मनसे युतीबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाहीये. नाशिकमध्ये चर्चा आटपली आहे, पुण्यातही विषय संपलाय. कल्याण डोबिंवलीतील विषय संपला. ठाणे आणि मीरा भाईंदर पालिकेचाही आम्ही विषय संपवला. आता इतक्या पालिकांचे काम करत असताना थोडा वेळ लागत असतो,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : पुण्यात राजकीय खलबतं? दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणुकीमधील घोटाळ्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “ठाकरेंची युती झाली आहे फक्त घोषणा बाकी आहे. ज्यापद्धतीने राज्यातील निकाल लावले गेले, ज्यापद्धतीने बिहारचे निकाल लावले गेले आणि लोकशाहीचा गळा घोटला जातो. निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सर्व संस्था भारतीय जनता पार्टी पायाखाली तुडवत आहे, त्यावर आता जर बोललो नाही तर नंतर उशीर झाला अशा भावना मरताना आल्यापेक्षा जिवंत असताना आलेल्या बऱ्या. आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत आणि जिवंत माणसे पाच वर्ष वाट बघत नाहीत. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचे राज्य आहे,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.