sharad pawar press marathi news on alliance with uddhav Thackeray in bmc elections 2025
Sharad Pawar Marathi News : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिका निवडणूकीसह राज्यातील सर्व पालिका आणि जिल्हापरिषदेवर झेंडा लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई पालिकेवर मागील अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. हेच वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गटाने मनसेसोबत युतीचा घाट घातला असल्याची चर्चा आहे. आता ठाकरे गट मुंबई पालिका निवडणूकीमध्ये महायुतीसोबत काम करणार की दुसरी राजकीय चाल खेळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केले आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीमध्ये महायुती एकत्रित लढण्याबाबत शरद पवार म्हणाले की, “अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. या निकालानंतर आता निवडणुका लांबवता येणार नाहीच. त्यामुळे साधारण तीन महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. आमचा निर्णय अद्याप झालेला नाही. अजून आम्ही चर्चा केलेली नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना व इतर छोटे पक्ष असे आम्ही सगळे एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरे जाता येईल का? यावर विचार करू त्याबाबत अंतिम निर्णय करून आमची एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सुरु आहे. मुंबईमध्ये मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या युतीबाबत सूचक विधान केले होते. तसेच शिंदे गट देखील मनसेला सोबत घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची देखील चर्चा होती. यानंतर आता मुंबई पालिकेबाबत शरद पवार म्हणाले की, “मुंबईबाबत अजून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईत आमच्या सगळ्यांमध्ये अधिक शक्तीस्थान उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्यात विचारात घ्यावं लागेल”, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तर तिसरी भाषा म्हणून इच्छुक विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय घेता येणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद उफाळला आहे. याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे मत मांडले. ते म्हणाले की, हिंदीची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेची द्वेषा करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही, फक्त सक्ती असू नये. शेवटी त्या विद्यार्थ्यांला जे हवंय ते त्याने करावं. त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यानुसार निर्णय घ्यावा. ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. संपूर्ण हिंदुस्थानातील जी लोकसंख्या आहे, त्यातील जवळपास ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पण त्यामुळे सक्ती करणं हे योग्य नाही, असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.